कल्याणीनगर भागात एका पब मालकाने जेवण करण्यासाठी आलेला वकील आणि त्यांच्या मित्रांवर पिस्तुल रोखून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पबमालकासह अंगरक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करणात आला.

या प्रकरणी एलरो पब बी ३ चे मालक सुमीत चौधरी यांच्यासह अंगरक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ॲड. मनोज सतीश माने (वय ३२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ॲड. माने आणि त्यांचे मित्र कल्याणीनगरमधील एका इमारतीत आठव्या मजल्यावर असलेल्या एलरो पब बी ३ मध्ये जेवण करण्यासाठी आले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाडे जेवण मिळेल का ?, अशी विचारणा केली. त्या वेळी सुरक्षारक्षक आणि ॲड. माने यांच्यात वाद झाला. वादातून दोघांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर पबचे मालक सुमीत चौधरी आणि अंगरक्षक तेथे आले.

चौधरी यांनी ॲड. माने आणि त्यांच्या मित्रांवर पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. ॲड. माने आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मित्रांना चौधरी, अंगरक्षक तसेच साथीदारांनी मारहाण केल्याचे ॲड. माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे.