पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पालक संस्था अर्थात ‘इनहाउस’ कोट्यांतर्गत प्रवेशांसाठी यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला संस्थाचालकांकडून विरोध करण्यात येत असून, या नियमामुळे राज्यभर अडचणी येणार असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षीपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांत ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यात महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती. यंदा शिक्षण विभागाने अकरावीची प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेचे माहितीपुस्तक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. त्यात, शिक्षण संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, हे दोन्ही एकाच संकुलात असतील, तरच त्या संस्थेचे विद्यार्थी इनहाउस कोट्यातील प्रवेशांस पात्र ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इनहाउस कोट्यांतर्गत १० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. गेल्या वर्षीपर्यंत असा नियम नव्हता.
शिक्षण विभागाने केलेल्या बदलाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ‘इनहाउस या शब्दाचा अर्थ संस्थांतर्गत असा आहे. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असण्याचा नियम चुकीचा आहे. एकाच संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. हा नियम विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. पूर्वीचा नियम बदलण्याची काहीही गरज नव्हती. हा बदल करताना प्राचार्य, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी अशा भागधारकांना विश्वासातही घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या नियमाविरोधात शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. पालकांनीही या निर्णयाविरोधात दाद मागितली पाहिजे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.
यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत इनहाउस कोट्यातील प्रवेशासाठी संबंधित संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे अपेक्षित आहे. या पूर्वी प्रवेश प्रक्रिया एकेका महानगरापुरती मर्यादित होती. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार प्रवेशासाठीची प्रणाली तयार करण्यात आली आहे.- डॉ. महेश पालकर संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग
‘द्विलक्ष्यी’चे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठीचेच प्रवेश केले जाणार आहेत. द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर केले जाणार आहेत. नियमित फेऱ्यांतील प्रवेशित विद्यार्थ्यांतून कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर समांतरपणे ते करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
७५ टक्के प्रवेश झाल्यावर वर्ग सुरू
कनिष्ठ महाविद्यालयांतील ७५ टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे स्वातंत्र्य कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे. मात्र, ११ ऑगस्टपर्यंत वर्ग सुरू करणे आवश्यक असेल. त्यापैकी जे आधी घडेल, ते करणे आवश्यक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.