पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात गांजाचा साठा करणाऱ्या व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला असून दुसऱ्या एका कारवाईत १० किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये १० लाख ६४ हजार रुपयांचा ४१ किलो गांजा विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी संजय मोहन शिंदे आणि रवींद्र काशीराम राठोड यांना अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून राहत असून त्याने ३१ किलो गांजाचा साठा जमा केला होता अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गांजा हा सुरज जंजाळ राहणार चाकण यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे: जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

दुसऱ्या एका कारवाईमध्ये रवींद्र काशीराम राठोड हा तालुका खेड वासुली फाटा या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा विकास बादले या नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे समोर आले आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडिक यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, संदीप पाटील, मनोज राठोड, मयूर वाडकर, संतोष भालेराव, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, दादा, प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे यांच्या टीमने केली आहे.