पिंपरी : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून बुधवारी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे विविध प्रकारचे सुमारे पाचशे मासे मृतावस्थेत आढळले. मृत माशांमध्ये गोल्डन, महाशिर, शिवडा असा प्रजातींचा समावेश असून त्यांची लांबी साधारण साडेतीन फूट आहे.
देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर बुधवारी नागरिक फिरायला गेले असता त्यांना कापूरवडा येथे सुमारे पाचशे मासे मृतावस्थेत आढळले. इंद्रायणी नदीत वाम, मरळ, चीलापी असे मासे आजवर आढळत होते. मात्र या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासे देखील असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत झालेल्या माशांमध्ये देवमासे देखील मरण पावले आहेत. इंद्रायणी नदी पात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या कापूरवडा परिसरात आले. मात्र ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आहे.
हेही वाचा >>>“त्याचं वय पाहता…”, पुण्यातून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर होताच दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट, म्हणाले…
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मुसडगे म्हणाले, की नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आरती डोळस आणि देहू नगरपंचायतीच्या मुख्याध्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. माशांच्या मत्यूची कारणे शोधण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाण्याचे नमुने देण्यात येणार असल्याचे डोळस यांनी सांगितले.