पुणे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या सूचनेनुसार गेल्या दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या, मात्र माहिती अद्ययावत न झालेल्या आधार अद्ययावतीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्याची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार असून नागरिकांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीशी संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व संबंधितांना हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. नागरिकांना आधार अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत आधार चालकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधार कार्ड हे विविध कामांमध्ये ओळखीसाठी महत्त्वाचे दस्तावेज म्हणून उपयोगात आणले जाते. अनेक शासकीय सेवा व सुविधांसाठीदेखील आधार पत्रिकेचा उपयोग करण्यात येतो. बऱ्याचदा आधारवर नमूद पत्ता बदल झाल्याने तो अद्ययावत करण्याची आवश्यकता असते.

हेही वाचा : योग्य नियोजन ‘पीएमआरडी’ ला नेणार शून्य कार्बन उत्सर्जनाकडे

नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधार पत्रिकेवरील तपशीलात बदल करू शकतात.बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक पांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, बीएसएनएलचे विक्री आणि व्यवस्थापन जिल्हा महाव्यवस्थापक सतीश आळंदकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूळ मूर्ती अकरा मारुती मंडळाकडे

‘माय आधार’ संकेतस्थळावर सुविधा

युएआयडीएआयने ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा तयार केली असून ‘माय आधार’ संकेतस्थळावर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरदेखील माहिती अद्ययावत करता येणार आहे. आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरूपाचे आहे. देशातील ४० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या १० वर्षात आधार अद्ययावतीकरण न केलेल्या नागरिकांनी आधार अद्ययावत करून घ्यावे आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A pilot project for updating information in aadhaar in pune collectors appeal to update aadhaar in pune print news tmb 01
First published on: 01-09-2022 at 13:20 IST