पुणे : खास क्रेडिट कार्ड योजनेचे आमिष दाखवून बँक खात्यातून साडेनऊ लाख रुपये काढून घेत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात घडला. यासंदर्भात डहाणूकर कॉलनी येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ९ ते १६ मे या कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खास क्रेडिट कार्ड योजनेची माहिती दिसल्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने मोबाइलमध्ये ती जाहिरात उघडली. त्यातील अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती भरल्यानंतर तक्रारदाराला ‘बँक ऑफ इंडिया’च्या नावाने संपर्क करण्यात आला. ‘तुमचे क्रेडिट कार्ड मंजूर झाले आहे. पुढील प्रक्रियेसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल,’असे दूरध्वनीवरून संभाषण करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतल्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडिओ कॉल केला. ॲडमिनिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आवश्यक असल्याचे सांगत एपीके फाइल पाठवून त्यावर क्लिक करण्यास त्यांना सांगितले. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातील सुमारे साडेनऊ लाख रुपये काढून घेतले.