पुणे : बदली किंवा रजेच्या कालावधीत ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून ‘सक्रिय’ राहून गैरप्रकार करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कृत्याला चाप लागणार आहे. बदली किंवा रजेवर असताना त्यांचे ‘लाॅगिन आयडी’ बंद करण्यात येणार असून, या कालावधीत त्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र ‘लाॅगिन आयडी’ दिला जाणार आहे. त्यासाठी यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी रजेवर असेल, तर त्याचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविला जातो. मात्र, रजेवर असताना तसेच, बदली झाल्यावरही तातडीने काही अधिकारी आणि कर्मचारी ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून रजा कालावधीत सक्रिय राहून काही कामांना मंजुरीही देत होते. त्यातून अनेक गैरप्रकार झाल्याची बाब उघडकीस आली.
गैरप्रकार समोर आल्यानंतर रजेवर असल्याचे कारण पुढे केले जात होते. या प्रकारावर आतापर्यंत कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेक गैरप्रकार झाल्याचे आणि त्याचा फटका प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे जमाबंदी आयुक्त कार्यालयाने रजा आणि बदलीच्या कालावधीत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे लाॅगिन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रजेच्या काळात ज्या अधिकाऱ्याकडे प्रभारी कार्यभार असेल, त्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र लाॅगिन आयडी तयार केला जाणार आहे. त्याचा सांकेतिक क्रमांकही (पासवर्ड) स्वतंत्र असणार आहे. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून लाॅगिन करावे लागणार असल्याने प्राप्त झालेल्या ओटीपीची नोंद केल्यावरच कामकाजाला प्रारंभ करता येणार आहे.
ही यंत्रणा तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वच ठिकाणी लागू केली जाणार आहे. प्रभारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला तेच जबाबदार राहणार आहेत. या नव्या निर्णयामुळे कामकाजात पारदर्शकता येईल, तसेच गैरप्रकाराची जबाबदारीही निश्चित होईल, असा दावा जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वच ठिकाणी ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. रजेवरील किंवा बदली झालेल्या अधिकाऱ्याचे लाॅगिन रद्द केले जाणार असून, प्रभारी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र लाॅगिन आयडी दिला जाणार आहे.- डाॅ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त