पुणे : ‘लोकांना काय हवे आहे आणि त्यांना कशाचा त्रास होतो, हे ज्याला कळते तोच चांगला नेता होऊ शकतो. नुसत्या घोषणांनी, सत्कारांनी नेता होता येत नाही. जो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो, तोच नेता असतो,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. भवाळकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला ‘सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागाचा विकास झाला. ग्रामीण भागातील मुलांसमोर नव्या संधी उदयाला आल्या. शिक्षण आणि शेतीसोबतच आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ग्रामीण भागाची प्रगती झाली. पण, नुसती पदवीची कागदपत्रे मिळवून विद्यार्थी घडत नाहीत. त्यांच्यात सामाजिक शहाणपण असणे गरजेचे असते. सामाजिक बांधिलकीतून सर्वांगीण विकास साधता येतो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शहाणपण रुजवणारे शिक्षण द्यायला हवे,’ असे डॉ. भवाळकर यांनी नमूद केले.
कदम कुटुंबीयांशी असलेला जिव्हाळा सांगताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘कदम कुटुंबीय जनहिताची कामे करणारी मंडळी आहेत. विद्यार्थ्यांकडे आत्मीयतेने पाहण्याची दृष्टी त्यांच्यात आहे. माणसे कशी जोडावीत हे कदम कुटुंबाकडून शिकण्यासारखे आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम हे दृष्टीसाक्षेपी द्रष्टे विचारवंत होते. पदवीच्या जोडीला आवश्यक सामाजिक शहाणपण त्यांच्याकडे असल्याने सहकारातून शेती, शिक्षण, आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विकास साधत त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.’
‘शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही नवनवीन आव्हाने पेलायची आहेत. कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. भारती अभिमत विद्यापीठाने कौशल्य विकास शिक्षणाभर द्यायला हवा. त्यासाठी सरकारकडून सहकार्य करण्यात येईल,’ असे लोढा यांनी सांगितले. मुश्रीफ यांनीही मनोगत व्यक्त केले.