रात्र नकोच वाटते! माजघरात दोन चेहरे समोरासमोर बसलेले असतात. एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून. लग्न न झालेली बनात्या आणि दुसरी लग्न होऊनही संसारसुखाला पारखी झालेली मावशी. स्वयंपाकघरात आजी धुसफूसत बदाम-पिस्त्याच्या गोळ्या करत असते. माजघराच्या माडीवरून खिदळणं ऐकू येतं. कारण दार बंद करून, संपूर्ण नग्नावस्थेत मांडीवरचं चांदणं गोंदण बघत उभी
असते – रुक्मिणी. कोठीच्या खोलीत विडीचा धूर. आजीच असेल बहुतेक! ओसरीवर यावं तर दारात विठ्ठलपंत धोतराच्या निऱ्या घालत माजघराच्या जिन्याकडे वाकून वाकून बघत असतात. खांबांना टेकून बाप्पा झुलपातली काडी काढून दात कोरत उभे! समोरच्या बैठ्या मेजावर पाय सोडून आबा विचारात मग्न. त्या वरच्या माडीवर नानासाहेब, बाळासाहेब खुर्चीवर मढ्यासारखे बसून आहेत. शून्यात बघत. पायऱ्या उतरून जावे तर समोर एका (एकनाथ) काकाचं रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पडलं आहे. माडीवरून उडी टाकून जीव दिल्यामुळे त्याचा डोळा फुटून कवटीतून बाहेर आला आहे. खळ्यात आलो तर आऊटहाऊसमध्ये हालचाल. क्षणात पेटत्या काडीसमोर उत्तेजित झालेली राधाक्का दिसते. तर ज्योत विझताच त्या ठिकाणी केशवपन केलेला तिचा भयाण चेहरा दिसतो.
साली ही नसती खुळं माझ्याच घरात का आहेत? उष्ण सुस्कारे टाकीत कुठल्या निरर्थकतेने नांदतायत? तहान मेलेला चेहरा घेऊन का वावरतायत? आसक्तीची आस नाही, विरक्तीचा ध्यास नाही. कुठलं हे थिजलेपण?
जयवंत दळवी हे नाव ज्यांना माहिती आहे, त्यांना कळलं असेलच, की ही पात्रं सारे प्रवासी घडीचे, धर्मानंद, अंधाराच्या पारंब्या, रुक्मिणी या त्यांच्या लिखाणातली आहेत. अनुक्रमे शाळकरी वय ते वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पुरुषाभोवती फिरणारी ही कथानकं – माझ्या पायाला सतत ठेचकाळत असतात. वासनांचे फुत्कार टाकीत सळसळत असतात. कारण मी ज्या घरात राहतो त्याच घरात दळवींनी या पात्रांना जन्माला घातले.
नात्याने ते माझे आजोबा. पण माझ्या जन्माच्या आधीच ते गेले. जाताना वारशादाखल हे खुळे सोबतीला सोडून गेले. आज मी पंचविशीत आहे. एका वेगळ्या मानसिकतेने जगाला सामोरा जातो आहे. आत्ता कुठे मानवी संबंध, त्यातली गुंतागुंत अंधुकशी दिसू लागली आहे. त्यात जगण्याचं हे दारुण विश्वदर्शन माझ्याच घरात घडतंय. अशा परिस्थितीत जगायचं कसं?
अपूर्णत्व घेऊन हिंडणारी ही माणसंच खरी ‘दळवी’ कुळाची सदस्य आहेत. आम्ही फक्त दळवी ‘आमच्या’ घरचे असा पोकळ डंका वाजवणारे कार्यकर्ते. पण दळवी आहेत ते याच पात्रांच्या मनात! तेच एकमेकांना अंतर्बाह्य जाणतात. त्यांच्याप्रति त्यांच्या या कुलपुरुषाला प्रचंड करुणा, आस्था, आकर्षण आणि प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी नजर मला मिळावी म्हणून आटापिटा चालला आहे. झालोच तर दळवींसारखा नाही, पण दळवी कुळातला लेखक नक्कीच व्हायचं आहे. कारण भोवतालचं राहणीमान बदललं असलं तरी गुंते तेच आहेत.
‘विषण्ण’ हा त्यांच्या आवडीचा शब्द असावा. बऱ्याच ठिकाणी येतो. मन विषण्ण झाल्याशिवाय ही भुतं उमगायची नाहीत. एसी गाडी करून प्रवासाला निघणाऱ्याचे हे काम नव्हे. उन्हात अनवाणी चाललो तर मग कदाचित कळेल, की ह्यांचं हे राहणं निरर्थक नाही. ही अमर माणसं माझीच आहेत! फक्त मी (किंवा कुणीच) त्यांना पूर्णत्व देऊ शकत नाही. फार फार तर अपूर्णत्वाच्या पुढच्या टप्प्यावर
त्यांना नेऊन सोडू शकतो.
पण असो रेंगाळणारी ही अस्वस्थ रात्रच मुळी माझी पुंजी आहे. तिच्याकडे समंजसतेने पाहायला हवं ! या सगळ्यांना कडकडून मिठी मारायला हवी. या रात्रीपलीकडचे जग चाचपून बघायला हवे. ते ही न घाबरता. कारण-
पहाटेच्या क्षितिजावर उभारोनि बाहे।
माझा आजा मज पालवीत आहे।
वेद दळवी
veddalvi@yahoo.co.in