आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतच राहिलेल्या समर्थकांचा पहिला गट रविवारी भाजपमध्ये दाखल झाला. भाजपमध्ये प्रथमच मोठय़ा संख्येने दाखल झालेली ही कार्यकर्त्यांची फौज पाहता खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहर भाजपला ‘अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात बांधकाम कामगार सेना व जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने बांधकाम कामगारांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे धनादेश दानवे यांच्या हस्ते वाटण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी, शिवसेना तसेच काँग्रेसच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घेण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. प्रदेश संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी, खासदार अमर साबळे, आमदार जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रभारी रवि अनासपुरे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. माजी उपमहापौर माई ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, चंद्रकांत नखाते, कुमार जाधव, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजू लोखंडे तसेच शेखर चिंचवडे, गजानन चिंचवडे, हरिभाऊ चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, सागर चिंचवडे, विठ्ठल भोईर, शशिकांत कदम, अरुण पवार, राजेंद्र इंगवले, नितीन इंगवले, अनिल जाधव, गणेश नखाते, मोना कुलकर्णी, संदीप सुर्वे, काळुराम बारणे, कैलास बारणे, अभिषेक बारणे, जयंत शिंदे, सुरेश वाडकर, संजय शेंडगे, अशोक गाडे, तुकाराम पडवळे, अमित चौकडे आदींचा समावेश आहे. प्रास्ताविक सारंग कामतेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच तास उशीर अन् दानवेंची दिलगिरी
कार्यक्रमाची वेळ सकाळी साडेअकराची होती. नाटय़गृहात तुडुंब गर्दी होती. मात्र रावसाहेब दानवे साडेचार वाजता आले. त्यांच्या उशिरा येण्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले. काही काळ गोंधळही झाला. कार्यक्रम सुरू होताच जोरदार पाऊसही सुरू झाल्याने त्यात भरच पडली. दानवे यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aacche din for pimpri bjp raosaheb danve
First published on: 30-03-2015 at 03:20 IST