देशाच्या सुरक्षिततेचे कारण देत माहितीस नकार

आधार कार्डसाठी नागरिकांकडून जमा करण्यात आलेली माहिती साठविण्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे किंवा माहिती संकलनाचे केंद्र (सव्‍‌र्हर) कोणत्या देशात आहे, या बाबत माहिती अधिकारात मागविलेला तपशील देण्यास भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडी) नकार देण्यात आला आहे. त्यासाठी देशाची सुरक्षितता हे कारण देण्यात आले असले, तरी नागरिकांकडून घेतलेली माहिती सुरक्षित आहे की नाही, हे यूआयडीने स्वत:हून जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

आधार कार्डसाठी नागरिकांकडून गोळा करण्यात येणारी माहिती आणि कार्डची सक्ती यावरून सर्वोच्च न्यायालयाने खासगीपणा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच दिला आहे. त्यामुळे आधारबाबत प्रश्नचिन्ह उभे असतानाच ‘आधार’च्या माहितीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने, सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यूआयडीकडे माहिती मागितली होती.  ‘आधार’ची माहिती साठविण्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे, माहिती संकलनाचे केंद्र कोणत्या देशात आहे, ते कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे, आदी प्रश्नांची उत्तरे यूआयडीकडे मागण्यात आली होती. यूआयडीकडून १ सप्टेंबरला वेलणकर यांना यासंबंधीचे पत्र मिळाले आहे. त्यामध्ये देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध, शास्त्रीय आणि अर्थविषयक गोपनीयतेच्या माहिती अधिकार कायद्यातील कलमाचा आधार घेत माहिती देणे टाळण्यात आले आहे. वेलणकर यांनी या बाबत सांगितले, की आधारसाठी घेण्यात येणाऱ्या माहितीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोक सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत आहेत. त्यामुळे ही माहिती सुरक्षित आहे की नाही, हे प्रत्येक नागरिकाला कळले पाहिजे. माहिती साठविण्यात येत असलेली कंपनी भारतीय की परदेशी आहे, त्या बाबतचे सव्‍‌र्हर चीनसारख्या देशांनी तर तयार केले नाही ना, हे जाणून घेण्यासाठीच माहिती मागण्यात आली होती. माहितीचे संकलन देशात किंवा देशाबाहेर होत असले, तरी ते सुरक्षित असल्याचे यूआयडीने स्वत:हून जाहीर केले पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही.