आंधळकरांची ‘सीबीआय’च्या कोठडीत रवानगी

सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणी भाऊसाहेब आंधळकर यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी दिले.

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणी निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी गुरुवारी दिले. शेट्टी यांच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून आंधळकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) बुधवारी अटक केली होती.
तळेगाव दाभाडे येथे १३ जानेवारी २०१० रोजी शेट्टी यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे होता. त्या वेळी आंधळकर या शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर आंधळकर यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, तपासात सीबीआयला काही धागेदोरे मिळाल्याने बुधवारी आंधळकर यांना अटक करण्यात आली.
गुरुवारी आंधळकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्यांचे समर्थकही मोठय़ा संख्येने न्यायालयाच्या आवारात होते. सीबीआयचे वरिष्ठ सरकारी वकील अतुल कुमार यांनी आंधळकर यांच्या कोठडीसाठी न्यायालयात युक्तिवाद केला. सीबीआयने शेट्टी प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आंधळकर यांचा प्रथमदर्शनी सहभाग आढळून आला असल्याने त्यांच्याकडे अधिक तपासाची आवश्यकता असल्याने त्यांना अटक करण्यात आली. कट रचून हा गुन्हा करण्यात आला असून, या कटाचा शोध घ्यायचा आहे. आंधळकरांच्या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती व धागेदोरे उलगडले जाण्याची शक्यता असून, त्यातून नेमके सत्य बाहेर येईल, असा युक्तिवाद अ‍ॅड. कुमार यांनी केला. गुन्ह्य़ात वापरलेले हत्यार जप्त करायचे आहे. त्याचप्रमाणे आंधळकर यांनी तपासात सहकार्याची भूमिका घेतली नाही. ते काही गोष्टी लपवित असल्याने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सीबीआयचे तपास अधिकारी, उपअधीक्षक विजय शुक्ला यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने पूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यावेळी आंधळकर यांची सत्यशोधन चाचणी (पोलिग्राफ) झाली होती. रिमांड अहवालामध्ये एकही पुरेसे कारण नसल्याने आंधळकर यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची मागणी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. जितेंद्र सावंत, अ‍ॅड. सुहास कोल्हे यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आंधळकर यांना नऊ दिवासांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aandhalkar cbi police custody