संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची उलटतपासणी घेण्यासाठी बचाव पक्षाला वेळ देऊनही आरोपीचे वकील हजर न राहिल्याची दखल घेत न्यायालयाने चौधरीची उर्वरित उलटतापसणी होणार नसल्याचा आदेश दिला आहे.
नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्याची शनिवारी तारीख होती. सकाळच्या सत्रात आरोपीचे वकील अॅड. बी. ए.अलुर हे उपस्थित राहतील असे सांगण्यात आले. ते खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयात उपस्थित झाले. पण, त्यानंतर पाच मिनिटांमध्ये येतो असे सांगून गेले ते सायंकाळपर्यंत न्यायालयात फिरकलेच नाहीत. न्यायालयात आज माफीच्या साक्षीदारांची उलटतपासणी होणार होती. पण, अॅड अलुर न आल्यामुळे न्यायालयाचा बराच वेळ वाया गेला. त्यामुळे न्यायालयाने अॅड. अलुर यांच्यावर ताशेरे ओढत माफीचा साक्षीदार चौधरी यांची उलटतपासणी संपल्याचे नमूद केले.