पुणे: भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन करून पिंपरी- चिंचवडलगतच्या परिसराला शिवनेरी जिल्हा असं नाव द्यावं अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. नवीन जिल्ह्यावरून आता शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन जिल्हा करण्यापेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे. शिवनेरी या नावाला माझा विरोध नाही. पण ही मागणी का केली जातेय? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार कोल्हे पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, “शिवनेरी या नावाला माझा विरोध नाही. पण, या मागणीचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. मागणी का केली जात आहे?, नेमके पर्याय काय आहेत. याचा विचार व्हायला हवा.” पुढे ते म्हणाले, “प्रशासकीय सोयीसाठी करणार असाल तर त्यापेक्षा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती द्यावी. यामुळे जुन्नर ते पुणे अंतर कमी होऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत अर्धा तासात जाऊ शकू. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याने पायाभूत सुविधांवर ताण वाढतो आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून एक सुनियोजित शहर वसवले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. यामुळे नागरिकांचे राहणीमान उंचावेल.”

आणखी वाचा-पिंपरी: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरुन आईकडून मुलीचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “जिल्ह्याचे विभाजन करून प्रशासकीय सोयीसाठी मुख्यालय कुठे असणार? जागा कुठे आरक्षित होणार?, सरकारी तिजोरीवर ताण किती वाढणार? तीच ताकद पायाभूत सुविधांवर लावली तर लोकांना फायदा होईल. पुणे जिल्हा विभाजनामागे राजकीय रंग असू शकतो. प्रत्येक पक्षाची शिरूर लोकसभा मतदारसंघावर महत्वकांक्षा असणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे यात काहीच गैर नाही” असेही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.