लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: खरीप हंगामातील पेरण्यांना गती येऊ लागली आहे. अपेक्षित पाऊस झालेल्या आणि वाफसा असलेल्या ठिकाणी पेरण्या होत आहेत. मंगळवारी, ४ जुलैअखेर राज्यात १४.४५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. चार जुलैअखेर सरासरी १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टरवर पेरण्या होतात. यंदा २० लाख ५१ हजार ९२५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तेलबिया आणि कापूस लागवडीला वेग आला आहे. भात, ज्वारी, तृणधान्य आणि कडधान्यांचा पेरा संथ गतीने सुरू आहे.

खरीप हंगामातील भात लावणीला मोठा फटका बसला आहे. सरासरी १ कोटी ५० लाख ८ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणे अपेक्षित असताना ७० हजार २४६ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या फक्त पाच टक्केच भात लावणी झालेली आहे. खरीप ज्वारीची पेरणी फक्त दोन टक्के, बाजरीची फक्त एक टक्के, नाचणीची चार टक्के आणि मक्याची आठ टक्के पेरणी झाली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका आणि अन्य तृणधान्यांची सरासरी ३४ लाख ७० हजार २७९ हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित असताना १ लाख ५९ हजार ३१५ हेक्टरवर म्हणजे पाच टक्के पेरणी झाली आहे.

आणखी वाचा-शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, राज्यभरात पावसाची उघडीप

कडधान्यांची पेरणी सरासरीच्या सात टक्के झाली आहे. तूर, मूग, उडीद आणि अन्य कडधान्यांची पेरणी २१ लाख ३८ हजार ५७१ हेक्टरवर होणे अपेक्षित असताना १ लाख ५९ हजार १८७ हेक्टरवर झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबिन आणि इतर तेलबियांची पेरणी अन्य पिकांच्या तुलनेत जास्त झाली आहे. तेलबियांची पेरणी सरासरीच्या अकरा टक्के झाली आहे. सरासरी ४३ लाख ९२ हजार ३४० हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित असताना ४ लाख ९५ हजार ५६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापूस लागवडी वेगाने होताना दिसत आहे. १२ लाख ३७ हजार ८५५ हेक्टरवर लागवड झाली असून, ती सरासरीच्या २९ टक्के आहे.

कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा परिसर वगळता राज्याच्या अन्य भागाला अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत. कृषी विभाग संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. -विकास पाटील, संचालक, निविष्ठा आणि गुण नियंत्रण