लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यात महामार्गांवर घडणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या निमित्ताने अपघातांची अनेक कारण समोर येत आहेत. त्यात सर्वांत महत्वाच्या घटक असलेल्या चालकाला व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम नसल्याचा मुद्दा आता वाहतूकदारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. याचबरोबर महामार्गांवर चालकांची आरोग्य तपासणी नियमितपणे करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
महामार्गांवरील अपघातांमागे वाहनातील दोषासोबत मानवी चुका समोर येतात. चालक हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तरी त्याला कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात नाही. सरकारने चालकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणी आता वाहतूकदारांकडून जोर धरू लागली आहे. याचबरोबर वाहन निर्मिती कंपन्यांही चालकांसाठी असे अभ्यासक्रम सुरू करू शकतात, असेही सुचविण्यात येत आहे.
राज्यातील महामार्गांवर वारंवार अपघात घडणारे ब्लॅकस्पॉट आहेत. या अपघातस्थळांची माहिती परिवहन विभागाने वाहतूकदारांना द्यायला हवी, अशीही मागणी केली जात आहे. याचबरोबर अशा ठिकाणी होणारे अपघात कमी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. चालकांची नियमितपणे आरोग्य तपासणी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
महामार्गांवर मालमोटार व बस चालकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा चालकाच्या दृष्टीमध्ये दोष असतो अथवा इतर आजार असतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याला तपासणी करण्यास वेळ मिळत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. -बाबा शिंदे, अध्यक्ष, माल व प्रवासी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक व्यवस्थेत चालक हा सर्वांत महत्वाचा आहे. चालकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. सरकारने पुढाकार घेऊन मोठ्या शहरांत चालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत. -राजन जुनवणे, अध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर असोसिएशन