गंभीर गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी पोलिसांना अनेक पातळीवर तपास करावा लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आरोपी पकडले जात नाहीत. वारजे भागात एका महिलेच्या खूनप्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. तेलंगणातील नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात नातेवाइकाकडे राहणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून माग काढण्यात आला. नक्षलग्रस्त भागातील दहशत तसेच तेथील स्थानिकांकडून पोलिसांना असहकार्य करण्यात आले. मात्र अडचणींवर मात करत अखेर पोलिसांनी आठ दिवसांत या गुन्ह्य़ाचा छडा लावला आणि थेट तेलंगणातील नक्षलग्रस्त भागातून आरोपीला पकडून पोलिसांनी पुण्यात आणले.
वारजेतील विठ्ठलनगर परिसरात कविता तारिया राठोड (वय २८) गेल्या काही वर्षांपासून पतीसोबत वास्तव्यास होती. तिचा पती मजुरी करतो. कविता बांधकाम मजूर आहे. मजुरी करताना तिची ओळख बांधकाम ठेकेदार गोपाळ बन्सी राठोड (वय २५) याच्याशी झाली होती. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर गोपाळ गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्य़ात असलेल्या जैनथ या मूळगावी राहत होता. गेल्या आठवडय़ात कविता बेपत्ता झाल्याची तक्रार पती तारियाने वारजे पोलिसांकडे दिली होती. पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. एक जानेवारी रोजी तिचा मृतदेह वारजेतील आरएमडी महाविद्यालयानजीक असलेल्या ओढय़ालगत असलेल्या पुलाखाली सापडला होता. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तेव्हा घटनास्थळी स्टिलचा डबा सापडला. डब्यावर तारिया राठोड असे नाव होते. दरम्यान, पोलिसांनी वारजे भागातून बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेण्यास सुरुवात केली. वारजे पोलीस ठाण्यात तारियाने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तारियाशी संपर्क साधला. तेव्हा पती तारियाने मृतावस्थेत सापडलेल्या पत्नीची ओळख पटवली. तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
कविता आणि आरोपी गोपाळ यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. गोपाळचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. गोपाळ वारजे भागातून पसार झाल्यानंतर तेलंगणात भावाकडे राहत असल्याची माहिती पोलीस नाईक मॅगी जाधव यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम धावडे, मॅगी जाधव, संजय दहिभाते, नितीन जगदाळे, अमोल काटकर यांचे पथक तातडीने तेलंगणात रवाना झाले. तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबल्या असल्या, तरी त्यांची दहशत कायम आहे. पोलिसांचे पथक जैनथ गावात पोहोचले. तेव्हा स्थानिकांकडून पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गोपाळचा माग काढण्याचे काम सुरू ठेवले होते.
आदिलाबाद जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. जैनथ गावानजीक असलेल्या सूतगिरणीत गेल्या काही महिन्यांपासून आरोपी गोपाळ काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुन्हा तेथे तपासासाठी पोहोचले. स्थानिकांनी आरोपीची माहिती देण्यात टाळाटाळ केली. पोलिसांचे पथक गोपाळ काम करत असलेल्या सूतगिरणीनजीक पोहोचले. सूतगिरणीत जाण्यास पोलिसांच्या पथकाला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी तेलंगणातील पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सूतगिरणीच्या मालकाला पोलिसांची ओळख पटवून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गोपाळच्या हालचालीवर नजर ठेवली. पोलिसांनी गोपाळला ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने कविताचा खून केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून त्याने कविताचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आठवडाभरात पोलिसांनी चिकाटीने तपास करून नक्षलग्रस्त भागातून गोपाळला अटक केली. आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. घटनास्थळी सापडलेल्या डब्यावरून कविताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
rahul.khaladkar@expressindia.com
