पुणे: दारु पिताना झालेल्या वादातून गच्चीत थांबलेल्या मित्राला धक्का दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली.
बैजू लक्ष्मी मंडल (वय ३५, सध्या रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी, मूळ रा. बिहार) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शंभू दपी राम (वय ४७) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत संतोष कोंडिबा गिनलवाड (वय ३२) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंडल, राम मजुरी करतात. ते मूळचे बिहारचे असून संजय गांधी सोसायटीत भाड्याने खोली घेऊन राहत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे यांनी दिली.
आरोपी शंभू आणि बैजु दररोज स्वयंपाक करायचे. शंभू किराणा माल दुकानातून सामान खरेदी करायचा. शंभूला उधारी किराणा माल देऊ नको, असे बैजुने किराणा माल दुकानदाराला सांगितले होते. दोघे जण रात्री घराच्या गच्चीवर दारु पित होते. किराणा माल दुकानदाराला उधारीवर माल देऊ नको, असे सांगितल्याने आरोपी शंभूने बैजुशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून शंभूने बैजुला गच्चीवरुन ढकलून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बैजुचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी शंभूला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.