पिंपरी: विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या तसेच मानसिक त्रास देऊन पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शाळांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात अनुदानित शाळांची संख्या मोठी आहे. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. अनेक अनुदानित शाळांमध्ये कायद्याची पायमल्ली होत आहे. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शाळा सोडलेले दाखले, गुणपत्रिका अडवून ठेवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शाळांची चौकशी करावी. आर्थिक लूट करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.