लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील खासगी भिंती भाजपच्या घोषणा आणि निवडणूक चिन्हाने रंगविण्यात आल्या होत्या. भाजपच्या ‘बूथ चलो’ अभियानाचा हा एक भाग होता. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेले हे रंगकाम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहे. शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी ठिकाणी विनापरवानगी राजकीय पक्ष, नेते आणि त्यांची चिन्हे झाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खासगी ठिकाणी विनापरवानगी हे काम झाले असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून ग्रामीण भागात ‘गाव चलो’ अभियान, तर शहरी भागासाठी ‘बूथ चलो’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी सोसायट्या, गृहसंकुलांच्या भिंतीवर कमळ हे पक्षचिन्ह, निवडणूक घोषवाक्य रंगविण्यात आले आहे. आता निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाजपकडून रंगविण्यात आल्या भिंती झाकण्यात येणार आहेत.

आणखी वाचा- पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्य अधिकारी, ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक यांना आचारसंहितेचे पालन करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. पुढील २४ तासांत सरकारी इमारती आणि त्यांच्या परिसरातील सर्व राजकीय पक्ष, नेत्यांचे फलक, नावे काढली जातील. त्यानंतरच्या २४ तासांत इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जाहिराती, फलक, नावे काढली जातील, तर त्यानंतरच्या २४ तासांत खासगी ठिकाणी विनापरवानगी राजकीय पक्ष, नेत्यांची चित्रे, फलक, पक्षाचे चिन्ह लावण्यात आले असल्यास संबंधितांना ते काढून घेण्याबाबत कळविले जाईल. काढण्यात आले नाही, तर प्रशासनाकडून ते काढले जाईल, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाईल. नागरिकांना असे प्रकार आढळून आल्यास त्यांनी सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करावी’, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.