सरलमधील माहिती भरण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पाच शाळांनी नकार दिला असल्याचे समोर येत आहे. या आणि माहिती देण्यास नकार देणाऱ्या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले. सरलची माहिती भरण्यासाठी गुरुवारी अंतिम मुदत आहे.
राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘सरल’ ही प्रणाली सुरू केली आहे. ही माहिती भरण्यासाठी गुरुवारी (१५ ऑक्टोबर) अंतिम मुदत आहे. मात्र, अद्यापही अनेक शाळांमध्ये ही माहिती भरून झालेलीच नाही. त्यातच ही माहिती भरण्यासाठी सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या काही शाळांनी लेखी नकार कळवला आहे. या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्याही अनेक शाळांकडून अद्याप माहिती भरून झालेली नाही. एका दिवसांत माहिती भरण्यासाठी आता शाळांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. त्यातच तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे मुख्याध्यापक हवालदिल झाले आहेत. आता भर म्हणून मान्यता काढून घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत जाधव यांनी सांगितले, ‘शाळांना गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत माहिती भरता येईल. या टप्प्यांत विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती भरायची आहे. ती न भरणाऱ्या शाळांची किंवा भरण्यासाठी नकार देणाऱ्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येणार आहे. त्याबाबत शिक्षण सचिवांकडूनच आदेश आले आहेत.’
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2015 रोजी प्रकाशित
सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता काढणार – शिक्षण उपसंचालक
राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘सरल’ ही प्रणाली सुरू केली आहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 15-10-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on schools who will not support saral