पुणे : सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणाऱ्या दुचाकी तसेच मोटारचालकांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्रेनवरील (टोईंग) कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून वाहने उचलण्याची कारवाई शिथिल झाली होती. टोईंग क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली तयार केली असून नियमांचे पालन करूनच वाहने उचलण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेशिस्तपणे वाहने लावण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा होता. अशा वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एका कंपनीकडे ठेकेदारी पद्धतीने काम सोपविण्यात आले आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार करण्यात आल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीतील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करून कारवाई थांबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. वाहने उचलणाऱ्या क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. कारवाई करताना क्रेनवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्यात यावे तसेच दिवसभरात उचललेल्या वाहनांची नोंद करण्यात यावी. नियमावलीमुळे वाहने उचलण्याच्या कारवाईत पारदर्शकता येणार आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागात बेशिस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग क्रेनचा वापर करण्यात येतो. विदर्भ इन्फोटेक या कंपनीकडून क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेकडे २६ क्रेन आहेत. वाहने उचलण्यासाठी कामगार तसेच प्रत्येक क्रेनवर एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. क्रेनवरील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी उद्धटपणे वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. वाहने उचलण्याची कारवाई पारदर्शक होण्यासाठी सर्व टोईंग क्रेनवर सीसीटीव्ही क्रेनवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही क्रेनवरील कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले होते. क्रेनवरील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांकडे वाहन परवान्याची मागणी केली जात होती, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या.

सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावण्यात येतात. नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी नियमावली करण्यात आली आहे. नियमांच्या अधीन राहून कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी नियमावली

वाहने उचलणाऱ्या क्रेनवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्यात यावेत. प्रत्येक क्रेनवरील कर्मचाऱ्याने नोंदवही बाळगणे बंधनकारक असून दररोजच्या कारवाईची माहिती नोंदवहीत लिहून ठेवावी. क्रेनवरील कर्मचाऱ्यांना वाहनचालकांशी थेट संपर्क साधू नये. क्रेनवरील पोलीस कर्मचाऱ्याने वाहनचालकांशी संपर्क साधून त्यांना कारवाईची माहिती द्यावी. प्रत्येक कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action pick up vehicles regulations action no parking transparent pune print news ysh
First published on: 02-08-2022 at 13:42 IST