लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहर आणि परिसरातील राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत गेल्या तीन दिवसांत ९०४ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून ९० हजार चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ‘पीएमआरडीए’ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे-नाशिक रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि पुणे-चांदणी चौक ते पौड रस्ता परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी झालेल्या कारवाईमध्ये २५२ अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यातून २५ हजार २०० चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. कारवाई सुरू झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत एकूण ९०४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, हरिष माने, ऋतुराज सोनावणे, प्रीतम चव्हाण, दीप्ती घुसे, सागर जाधव, दिपक माने यांच्या पथकाने केली. पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आली.