पुणे : बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार पक्ष) माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. ५० हजारांचा जात मुचलका, तसेच अटी, शर्तींवर मानकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बनावट दस्त तयार करून आर्थिक व्यवहार कायदेशीर असल्याचे भासविल्याप्रकरणी दीपक माधवराव मानकर यांच्यासह शंतनू सॅम्युअल कुकडे, रौनक जैन यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मानकर यांनी ॲड. सुधीर शहा आणि ॲड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज सादर केला. या गुन्ह्यातील पुरावे कागदपत्र स्वरुपातील आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहितेचे कलम ३३८ (मूल्यवान रोख्यांचे बनावटीकरण) लागू होत नाही, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. शहा आणि ॲड. दुशिंग यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या खटल्याशी संबंधित व्यक्तीला प्रलोभन दाखवू नये, तसेच धमकी देऊ नये. तपासात सहकार्य करावे, अशा अटी आणि शर्तींवर न्यायालयाने मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन अर्जावर २७ मे रोजी सुनावणी होणार आहे.