पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती सोमवारी (३० जून) सुरू झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुणे विभागातील १० हजार ८३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५ हजार ४९७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पुणे विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात अकरावीसाठी १ हजार ५३९ महाविद्यालयातील एकूण ३ लाख २७ हजार ४२६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण १ लाख २६ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मिळून पुणे जिल्ह्यातील ६९५ महाविद्यालयांत १ लाख ९९ हजार ४५६ जागांसाठी ७५ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ४५३ महाविद्यालयांतील ९८ हजार ५९० जागांसाठी ३० हजार १२९ विद्यार्थ्यांनी, तर सोलापूर जिल्ह्यातील ३९१ महाविद्यालयांतील ७७ हजार ३४५ जागांसाठी २१ हजार ८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील २ हजार ९८८, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ३५० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत आहे. अधिक माहिती https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. काही अडचणी आल्यास ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.