चिन्मय पाटणकर
११७ वर्षांनंतर अरबी समुद्रात..
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘क्यार’ आणि ‘माहा’ या चक्रीवादळांनी राज्यात पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अरबी समुद्रात एकाच वर्षांत वाऱ्याचा ४८ केटीपेक्षा (८८.८ किलोमीटर प्रति तास) जास्त वेग असलेली चार चक्रीवादळे होण्याची घटना तब्बल ११७ वर्षांनी घडली आहे. यापूर्वी १९०२ मध्ये एकाच वर्षांत पाच चक्रीवादळे निर्माण झाली होती.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या माहितीनुसार १९०२, १९४८, १९७५, १९८२, १९९८, २००४ आणि २०१५ या वर्षी अरबी समुद्र ‘अॅक्टिव्ह’ असल्याची नोंद आहे. या काळात कमाल १७ केटी (३१.४५ किमी प्रति तास) वाऱ्याचा वेग असलेले चक्रीवादळ निर्माण होण्याची पूर्वस्थिती (सायक्लोनिक डिस्टर्बन्स) पाच किंवा त्याहून जास्त वेळा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. १८९१ ते २०१९ दरम्यान कमाल ३४ केटी (६२.९ किमी प्रति तास) वाऱ्याचा वेग असलेले चक्रीवादळ निर्माण होण्याची पूर्वस्थिती सहा वेळा निर्माण झाली. प्रत्यक्षात त्यातून तीन चक्रीवादळे निर्माण झाली. १९९८ आणि २००४ मध्येही तीन चक्रीवादळे झाली होती. मात्र, या वर्षी अरबी समुद्रात वाऱ्याचा कमाल ६४ केटींपेक्षा (११८.४ किमी प्रति तास) जास्त वेग असलेली वायू, हिका, क्यार आणि माहा ही चार महाचक्रीवादळे निर्माण झाली आहेत. हवामानासाठी उपग्रहांचा वापर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती दिसून येत आहे.
‘बंगालच्या उपसागरात एकाच वर्षांत सातत्याने चक्रीवादळे निर्माण होण्याची पूर्वस्थिती किंवा चक्रीवादळे बरेचदा झाली आहेत. मात्र, अरबी समुद्रात अशी स्थिती फारच कमी वेळा आढळून आली आहे. त्यामुळे अरबी समुद्रात एकाच वर्षांत चार चक्रीवादळे निर्माण होण्याची स्थिती दुर्मीळ म्हणावी लागेल,’ असे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
उपग्रहांकडून मिळणाऱ्या छायाचित्रांद्वारे माहिती
बंगालच्या उपसागरात १९६६ मध्ये एका महिन्यात चार चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यापूर्वी १९२२ मध्येही १७ दिवसांत तीन चक्रीवादळे निर्माण झाली होती. १९६६ मधील पहिली दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन पूर्ण द्वीपकल्प पार करून अरबी समुद्रात पोहोचली होती, अशी नोंद हवामानशास्त्र विभागाकडे आहे. हवामानाच्या अंदाजासाठी १९६५ नंतर उपग्रहांचा वापर सुरू झाला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील स्थितीचा, चक्रीवादळांचा ‘आरएसएमसी’ (रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर फॉर ट्रॉपिकल सायक्लोन्स ओव्हर नॉर्थ इंडियन ओशन) सातत्याने अभ्यास केला जातो. समुद्री भागात अन्य काहीच स्रोत उपलब्ध नसल्याने उपग्रहांकडून मिळणाऱ्या छायाचित्रांचा वापर केला जातो. भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर रडार यंत्रणा कार्यान्वित आहे. उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून चक्रीवादळाचे अंदाज दिले जातात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
