scorecardresearch

वसंत मोरेंना राष्ट्रवादीच्या ‘मागणी’मुळे पुण्यातील राजकीय समीकरणांत नवी बेरीज-वजाबाकी

मनसेचे शहरातील पदाधिकाऱ्यांनीही मोरे यांची ही ‘स्टंडबाजी’ असल्याची टीप्पणी केल्याने मोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाणार की, हे पेल्यातील वादळ ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वसंत मोरेंना राष्ट्रवादीच्या ‘मागणी’मुळे पुण्यातील राजकीय समीकरणांत नवी बेरीज-वजाबाकी
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सुजित तांबडे

मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना अजित पवार यांनी ‘तात्या, कधी येता, वाट पहातोय’ असे सूचक विधान केल्याने मोरे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. मोरे यांनी मनसेमध्येच असल्याचे स्पष्ट करत सावध भूमिका घेतली असताना शहर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोरे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिलेला नाही. मनसेचे शहरातील पदाधिकाऱ्यांनीही मोरे यांची ही ‘स्टंडबाजी’ असल्याची टीप्पणी केल्याने मोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाणार की, हे पेल्यातील वादळ ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या निमित्ताने पुणे शहरातील राजकारणात बेरीज-वजाबाकीचा नवा खेळ रंगला आहे.

मोरे यांना मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आल्यापासून ते सतत संधी मिळेल तेव्हा शहर पदाधिकाऱ्यांवर टीका करत नाराजी व्यक्त करत आहेत. रविवारी एका लग्न समारंभात अजित पवार आणि मोरे यांची भेट झाल्यावर पवार यांनी सहजपणे ‘तात्या, कधी येता, वाट पाहातोय’ असे वक्तव्य केल्याने मोरेंची नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. आता मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, याबाबत तर्कवितर्क केले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी: रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना राजकीय पक्षांची कसरत

पवार यांच्या वक्तव्यानंतर मोरे यांनीही सावध भूमिका घेतली आहे. अद्याप मनसेमध्येच असून, शहर पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. पवार यांनी आपल्या कामाची पावती दिल्याचे सांगत मोरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी अद्याप चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे पक्षाची भूमिका मांडण्यात आलेली नाही. याबाबतचा निर्णय राज ठाकरे हे घेतील. मात्र, मोरे यांची ही नेहमीचीच ‘स्टंटबाजी’ असल्याची टीकाही सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोणत्या ना कोणत्या मार्गांनी चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करत असल्याचाही आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा: शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक

राष्ट्रवादी काँग्रेसने मोरे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिलेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, एका लग्न समारंभात अजित पवार आणि मोरे यांच्यात झालेला हा संवाद आहे. त्यावेळी मीदेखील तेथे होतो. पवार यांनी ‘तात्या, कधी येता, वाट पाहातोय’ असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. मोरे यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मोरे यांची सावध भूमिका, शहर मनसेकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोरे यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा न देणे, अशा पार्श्वभूमीवर मोरे हे कोणता निर्णय घेणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:23 IST

संबंधित बातम्या