पुणे : महापालिका मुख्य इमारतीमधील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिलांसाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष अखेर वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर कार्यान्वित करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा कक्ष सुरू आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी येत असल्याचे कळविल्यानंतर तातडीने चक्रे फिरली आणि मुख्य इमारतीतील तळमजल्यावर तो सुरू करण्यात आला. मात्र यानिमित्ताने महापालिका महिलांच्या प्रश्नासंदर्भात किती असंवेदनशील आहे, हे स्पष्ट झाले.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आणि कामानिमित्त महापालिका भवनात येणाऱ्या महिलांसाठी सन २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करून हिरकणी कक्ष उभारण्यात आला. या कक्षात स्तनदा मातांसाठी बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीतील तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. मात्र वर्षभरापूर्वी हिरकणी कक्ष काढून तेथे दिव्यांग कक्ष सुरू करण्यात आला होता. हिरकणी कक्षासाठी कागदोपत्री तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत जागा देण्यात आली होती. मात्र ही जागा मालमत्ता विभागाच्या ताब्यात होती आणि त्यांनी हिरकणी कक्षासाठी जागेचा ताबा दिलेला नव्हता.
हेही वाचा >>>पुणे : कोंढव्यात पावसात थांबलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळातील हिरकणी कक्षाचा मुद्दा पुढे आल्यानंतर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेतील हिरकणी कक्षाची वस्तुस्थिती पुढे आणली होती. त्यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने विवेक वेलणकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली होती.
हेही वाचा >>>मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली: रुपाली चाकणकर
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्याची दखल घेत हिरकणी कक्ष तातडीने सुरू करण्याचा आदेश पत्राद्वारे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिला होता. मात्र प्रशासनाकडून या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे वेलणकर यांनी पुन्हा राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हिरकणी कक्षाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचे महापालिकेला कळविले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरील सूत्रे तातडीने हालली आणि तळमजल्यावर रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला.