पुणे : जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावामध्ये वाघ आणि बछडे फिरत असल्याची अफवा असल्याचे जुन्नर वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून वाघाचे छायाचित्र तयार करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी संबंधितांना वनविभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे.

मंगरूळ येथे सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी नितीन लक्ष्मण मिंडे यांनी त्यांच्या मुलाला वाघ दिल्याची मुलाखत एका स्थानिक यूट्यूब चॅनलेला दिली होती. वाघाचे छायाचित्र मोबाईलच्या माध्यमातून घराच्या कुंपणातून काढले असून वाघ आणि बछडे परिसरात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जुन्नर वनविभागाअंतर्गत ओतूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी चैतन्य कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली. यासंदर्भात संबंधितांकडे कसून चौकशी केल्यानंतर ‘एआय जेमिनी ॲप’ प्रणालीचा वापर करून वाघाचे छायाचित्र त्यावर टाकून ते खरे असल्याचे भासविण्यात आल्याचे त्यांनी जबाबात सांगितले. त्यासंदर्भातील नोंदीही त्यांनी वनविभागाकडे दिल्या. त्यानंतर भीती तसेच खोटी माहिती पसरविल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाडून संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

दरम्यान, अफवा पसरविणे, लोकांमध्ये भीती निर्माण करणे, खोटी माहिती समाजमाध्यमांतून प्रसारित केल्यास भारतीय न्यायसंहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदीनुसार तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, असे जुन्नर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित शिंदे यांनी सांगितले.