Pune Traffic WhatsApp Chatbot / पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ई-चलन’ यंत्राच्या दंडात्मक कारवाईसाठी लागणारा विलंब कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) दूर करण्यासाठी ‘व्हाॅट्सॲप-चॅटबाॅट’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदविता येणार असल्याने बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर सामान्य नागरिकांचाही सहभाग असणार आहे. बुधवारी (१ ऑक्टोबर) या प्रणालीची प्राथमिक चाचणी घेण्यात आली.
पुणे शहरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये बेशिस्त वाहनचालकांचा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा समावेश आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ‘ट्रिपल सीट’ वाहन चालवणे, वेगाने वाहन चालविणे, वाहतूक नियंत्रण दिव्यांचे (सिग्नल) उल्लंघन, चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, विना हेल्मेट, प्रवेश नसताना वाहने आदी प्रकार नेहमीच घडत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी चौकाचौकात वाहतूक पोलीस कार्यरत असतात.
ई-चलन या यंत्राच्या साहाय्याने पोलिसांकडून संबंधित वाहनाचा नंबर यंत्रात समाविष्ट करणे, त्यानंतर फोटो काढून वाहनचालकाच्या नावावर चलन पाठविणे या प्रक्रियेला वेळ लागतो. ही प्रक्रिया आणखी सुलभ आणि सुटसुटीत करून सामान्य नागरिकांनाही बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘व्हाॅट्स ॲप चॅटबाॅट’ ही ‘एआय’ आधारित प्रणाली विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, ‘अनेकदा पुणे वाहतूक पोलिसांनी यापूर्वी पीटीपी ॲप आणि एआय आधारित सीसीटीव्ही आधारित कॅमेरे यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. आता हे चॅटबॉट त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या प्रणालीमुळे सामान्य नागरिकांनाही चॅटबॉटद्वारे हेल्मेट न घालणे, ट्रिपल राइडिंग, चुकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास त्यांचे छायाचित्र काढून वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. एआय या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करून हे चॅटबॉट प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्वरित माहिती देण्यात येईल. त्यानंतर वाहनचालकाच्या नावाने थेट चलनाची दंडात्मक कारवाई होईल.’
पारदर्शकतेसाठी चॅटबाॅटवर प्राप्त झालेली माहिती ८० टक्क्यांपेक्षा अधिक अचूक आहे किंवा नाही, याची या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच पडताळणी झाल्यानंतरच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ‘व्हाॅट्सॲप-चॅटबाॅट’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. बुधवारी (१ ऑक्टोबर) याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या अडचणी, त्रुटी, दुरुस्ती करण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यांत ही प्रणाली विकसित करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न आहे. – हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे.