पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्ये सहआरोपी असलेला ससून सर्वोपचार रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याने पदाचा दुरुपयोग करून बनावट व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या गुन्ह्यात त्याच्या आणखी कोणत्या सहकाऱ्याचा सहभाग आहे का, याबाबत तपास करायचा आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे मोटार अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटारचालकाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे त्याला न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटने बुधवारी ताब्यात घेऊन गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी तावरेसह एकूण १७ आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये रुग्ण, रुग्णाची पत्नी, रुग्णाचे नातेवाईक, बनावट दाते, डॉक्टरांचा समावेश आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती.

याप्रकरणी आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत अवयवदाता आणि प्रत्यारोपित रुग्णाची ओळख पडताळून कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीची असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. अजय तावरे हा या समितीचा अध्यक्ष होता. त्याने या प्रकरणातील किडनी दाता, प्रत्यारोपित रुग्ण व साक्षीदार नातेवाइकाची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात त्याची मुख्य जबाबदारी होती, असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात नमूद आहे.

ससूनच्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीच्या मुलाखतीसाठी रुग्ण अमित साळुंखेची पत्नी सुजाताऐवजी हजर राहिलेल्या सारिका सुतारच्या वयात तफावत होती. आरोपी शंकर पाटील, सारिका सुतार यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. समितीच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्या उत्तरात विसंगती आढळून आल्या. तरीही तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिली. तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने एकूण नऊ किडनी प्रत्यारोपण प्रकरणांना परवानगी दिली आहे. त्याबाबत तपास करायचा असून, आणखी काही अवयवदान प्रकरणांमध्ये गैरप्रकार केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपी अजय तावरेला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी तपास अधिकारी सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबीच्या डॉक्टरांविरोधात आरोपपत्र नाही

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासात रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी, रुग्णालयातील मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अभय सद्रे, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले नाही. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कायदेशीर मार्गाने केली असून, आरोपींनी बैठकीच्या वेळी खोटे बोलून डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांविरोधात सबळ पुरावे नसल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.