पुणे : धायरी परिसरात करण्यात असलेल्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार आणि त्यांचे पहाटेचे दौरे यावर या बॅनरबाजीतून भाष्य करण्यात आले आहे. स्थानिक खासदार, आमदार व शासन नियुक्त प्रतिनिधींचेही कान टोचण्याचे काम या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले. आता धायरी डीपी रोडच्या कामाला गती मिळावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पहाटेचा एकदा तरी दौरा करावा, ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ‘दादा एक पहाटे दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की’, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत धायरी हा पुण्यातील वेगाने विस्तरणारा परिसर ठरला आहे. लोकसंख्येची वाढ, गृहनिर्माण प्रकल्पांची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस अपुरे पडणारे रस्ते, अशी स्थिती सध्या झाली आहे. रस्त्यांच्या तुलनेत वाहतुकीचे प्रमाण अनेक पटीने वाढले आहे. सिंहगड रस्त्यामार्गे धायरीहून शहरात जाणाऱ्या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मार्ग काढावा लागतो. यात नागरिकांचा दररोज मोठा वेळ वाया जात आहे. याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांवर अवलंबित्व वाढले आहे. यामुळे कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे.
या पार्श्वभूमीवर धायरी परिसरात लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समस्त ग्रामस्थ धायरी गाव आणि धायरी गाव डीपी रोड वेल्फेअर ट्रस्ट, असे नाव बॅनरखाली नमूद करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पहाटेच्या दौऱ्यांचे सत्र सुरू केले आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी विविध रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.
खासदार, आमदारांनाही आवाहन
तसेच धायरी परिसराचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार, आमदार आणि शासन नियुक्त सदस्य यांनाही याच प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. धायरीतील अनेक रहिवासी संघटनांनी समाज माध्यमातूनही याकडे लक्ष वेधले आहे. हिंजवडी आयटी पार्कसाठी नागरिकांच्या दबावामुळे शासनाला वाहतूक सुधारण्यासाठी पुढे यावे लागत असेल, तर धायरी परिसरासाठीही तत्काळ नियोजनाची गरज आहे, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील मोहिमेचा प्रभाव
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी राबवलेल्या #UnclogHinjawadiITPark मोहिमेचे पडसाद आता शहरातील इतर भागांतही उमटू लागले आहेत. विशेषतः धायरी परिसरातील नागरिकांनीही याच धर्तीवर वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी धायरी परिसरात फ्लेक्स लावून सर्वांचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.