राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक वरिष्ठ नेत्यांसह आमदारांचा मोठा गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट आणि अजित पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध झालं. मात्र, नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आलेले दिसले. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं. आता याबाबत अजित पवारांना पुण्यात विचारलं असता त्यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, “मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर काहीही बोलायचं नाही. माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला विचारा.”

“प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली”

“मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेतो आहे त्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांना गती देतो आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“आढावा घेतला की अडचण आलेल्या कामाला गती मिळते”

“त्यासाठी १५ दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेत असतो. ती कामं कशामुळे थांबली आहेत, का पुढे जात नाहीत, काय अडचणी आहेत हे सोडवतो. याचा आढावा घेतला की आपोआप त्या कामाला गती मिळते,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे”

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं.”