पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, असा आमचा हट्ट राहणार असल्याचे सांगत मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळवर दावा सांगितला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवरती उमेदवारी मागणे आणि निवडून येणे हे आता सोपे राहिलेले नाही असे सांगत खासदार श्रीरंग बारणेंनाही त्यांनी टोला लगाविला.
तळेगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आमदार शेळके म्हणाले, खासदार बारणे यांना २०१४ मध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही तन-मन-धनाने प्रयत्न केले. युतीमधील आम्ही कार्यकर्ते होतो. त्यामुळे आम्ही दोन्ही वेळेस प्रामाणिकपणे त्यांचे काम केले. मोदींच्या करिष्मावर बारणेंना दोन्ही वेळेस मतदान मिळाले, ते निवडून आले. त्यांचेही काही योगदान असेल. परंतु, त्यांनी आजपर्यंत मला पुन्हा संधी पाहिजे, असे वक्तव्य केलेले मला तरी दिसून आलेले नाही. कदाचित त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली. तर, मावळ तालुक्यातील जनतेला केंद्रातील किती योजनांचा लाभ दिला, कोणते मोठे प्रकल्प आणले याची माहिती त्यांनी द्यावी.
हेही वाचा – पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत; घराच्या काचा फोडल्या
केंद्राच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील मुंबई-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाच्या संदर्भातील कामे, तळेगाव, भेगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा मिसाईल प्रकल्पातील प्रश्न, तळेगाव दाभाडे, लोणावळ्यासह रेल्वे स्टेशनबाबत ज्या काही अडचणी, प्रश्न आहेत, हे का सोडविले नाहीत, काय अडचणी आल्या. नऊ वर्ष सत्तेत असताना हे प्रश्न का सोडविले नाहीत, याचे उत्तरदेखील त्यांनी द्यावे, असेही आमदार शेळके म्हणाले.
मतदारसंघातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगणार
मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. आमदार म्हणून समाधानी आहे. तसेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व परिस्थितीचा लेखी आराखडा येत्या आठ दिवसांत देणार असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.
हेही वाचा – बारामतीमधील दुष्काळाबाबत सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
खासदार बारणेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवरती उमेदवारी मागणे आणि निवडून येणे हे आता सोपे राहिलेले नाही. मोदींच्या करिष्मावर मी पुन्हा खासदार होईल अशी स्वप्ने जर कोणी बघत असेल तर ती स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, असा टोलाही शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव न घेता लगावला.