पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या उपक्रमांतर्गत रविवारपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी हडपसर, मांजरी, बी. टी. कवडे रस्ता परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांच्या घरी जाऊन चहा, नाष्टा, भेळ, मिसळीचा आस्वाद घेतला.

पवार यांच्या या नवीन कृतीमुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत असून, त्यांचे जोरदार उत्साहाने स्वागत केले जात आहे. कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून फुलांची पुष्पवृष्टी करून, तसेच तीस ते चाळीस फूट उंच हार घालून पवार यांचे स्वागत केले. आमदार चेतन तुपे, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका प्रभाग रचनेवर हरकती, सुनावणी प्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातर्फे आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय गणिते बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार अजित पवार यांनी दिवसभर पक्षातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच, प्रभागातील समस्यांबाबत चर्चा करून त्याबाबत तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या.

सकाळी आठपासून सुरू केलेल्या गाठीभेटींमध्ये पवार यांनी नाष्टा, चहादेखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी, तसेच हॉटेलमध्ये केले. बी. टी. कवडे रस्ता येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन गावडे यांच्या घरी त्यांनी भेट दिली. परिवारातील सदस्यांसोबत चर्चा करून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर केशवनगर येथील परिसराची पाहणी करून ११ वाजता पवार यांनी सोमेश्वर भेळेवर ताव मारला, तर दुपारी १ वाजता १५ नंबर चौक येथील घाडगे मिसळ येथे जाऊन तर्रिबाज मिसळीची चव घेतली.

पवार यांनी कार्यकर्त्यांच्या घरी, हॉटेलवर जाऊन चहा, भेळ, मिसळीचा आस्वाद घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. गेल्याच आठवड्यात अजित पवार अंजना कृष्णा यांच्याशी झालेला संवाद व्हायरल झाल्यानंतर टीकेचे धनी ठरले होते. त्यानंतर त्यांच्या या कार्यकर्ता संपर्क कृतीमुळे ही चर्चा मागे पडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नव्या उपक्रमाबद्दल बोलले जाऊ लागले आहे.