पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या त्यांच्या विधानाने आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत असून आज सांयकाळपर्यंत आघाडीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यातील आगामी महापालिकांची निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहे.  जिथे वाद नाही तिथे आघाडी होईल असे ते म्हणाले. जिथे वाद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सात प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मागील पंधरा दिवसापासून आघाडी करण्याबाबत फक्त चर्चा करीत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महापालिकेत सत्तेमध्ये आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप ला मिळालेले यश लक्षात घेता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलाच धसका घेतल्याचे मागील पंधरा दिवसातील आघाडीच्या बैठकीवरून स्पष्ट होत आहे.

आज पुण्यात आघाडी च्या बैठकीला अजित पवार, खासदार वंदना चव्हाण आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि विश्वजित कदम उपस्थित होते. यांच्यामध्ये जवळपास एक तासाहून अधिक काळ चर्चा झाली. ज्या प्रभागात वाद नाही तिथे आघाडी करायची आणि ज्या भागात वाद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढत द्याची. तसेच जवळपास सात प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. अशी चर्चा यावेळी झाली. यावर अंतिम निर्णय प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे निर्णय घेणार असून त्यासाठी रमेश बागवे मुंबईला गेले आहेत. आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. सध्या शहरात आघाडीचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांना प्रचार करणे अवघड झाले आहे. शिवसेना, भाजप, मनसे चे उमेदवार काही भागात प्रचार करताना दिसत आहे.