एकीकडे राष्ट्रीय स्तरावर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची चर्चा असताना दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे राजकीय वर्तुळाला वेध लागले आहेत. भाजपा आणि शिंदे गट यांच्यातील जागावाटपाप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये नेमकं जागावाटप कसं होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्या या निवडणुकीनंतर अस्तित्वात आल्यामुळे आता निवडणूकपूर्व आघाडीत जागावाटप कसं होणार? याची उत्सुकता आहे. त्यातच महाविकास आघाडीतच पुण्यातील लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत खडाजंगी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. नेमकं काय झालं? पुण्यातील लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यावर पोटनिवडणूक लागणार की नाही? यावर चर्चा असतानाच तिथल्या आगामी उमेदवारीवरही तर्क-वितर्क लावले जात आहेत. गिरीश बापट यांनी २०१९मध्ये ज्यांचा पराभव केला, ते काँग्रेसचे मोहन जोशी या जागेसाठी उत्सुक आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार असा दावा केला आहे. यासंदर्भात अजित पवारांनी विरोधी भूमिका मांडली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. "आम्ही दोघांनी सांगून काही होणार नाही. वरच्या स्तरावर चर्चा होईल. पण एक आहे. आज काँग्रेसनं काहीही म्हटलं, तरी पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. आमदारांना पडलेली मतं बघा. सहा वर्षांपूर्वी झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीतही काय परिस्थिती होती ते बघा. पुण्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलराव गाडगीळांनंतर कधीही काँग्रेसनं जिंकलेली नाही. गेल्या वेळी गिरीश बापट निवडून आले. काही लाखांनी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्याआधी अनिल शिरोळे निवडून आले. तेव्हाही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्याआधीही भाजपाचेच उमेदवार निवडून आले", असं सांगत अजित पवारांनी गेल्या निवडणुकांमधले दाखले दिले. ”देशात राज्यसभा आहे की नाही?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरून सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला प्रश्न; म्हणाल्या, “कार्यक्रमाला गेलो असतो, पण…” "सातत्याने निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तिथे ते पराभूत होत आहेत. असं असेल तर तिथे त्यांच्या मित्रपक्षांपैकी कुणाची ताकद असेल तर त्याला ती जागा दिली पाहिजे. अर्थात, अजून ते अंतिम झालेलं नाही. ती जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे", असंही अजित पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांना टोला दरम्यान, मविआमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी टोला लगावला. "मविआत फूट पडावी असं त्यांना वाटतंय. ते तशी स्वप्नं बघत असतील, तर त्यांना शुभेच्छा! जागावाटपासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसतील. व्यवस्थित जागावाटप होईल. आज तिन्ही पक्षांची प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक ताकद आहे. तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करतील. आम्हाला विश्वास आहे की यात व्यवस्थित, तुटेपर्यंत न ताणता जागावाटप वगैरे होईल", असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.