पुणे : ‘मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेच्या कामामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात पाणी साठत आहे. त्यामुळे पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यापूर्वी अडथळे दूर झाले नाहीत, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला दहा कोटी रुपये दंडाची नोटीस पाठवावी,’ असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले.
पालखी सोहळा पूर्वतयारी आणि करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डाॅ. जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे आदेश दिले.‘गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असून, वाहतूक कोंडी होत आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. त्यामध्ये हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता दोन्ही महापालिका आणि महामेट्रो यांनी कार्यवाही करावी,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘सासवड येथील दिवे घाटात पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहे. त्या ठिकाणी नाल्यांचे काम सुरू आहे. हे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, पावसामुळे खडक ठिसूळ झाला असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरांच्या भागात लोखंडी अडथळे लावून हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत,’ असेही पवार म्हणाले.