Ajit Pawar In Baramati : अजित पवार हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात, कधी ते त्यांच्या खास शैलीत एखाद्याला रागावतात, तर कधी आपल्या मिश्किल स्वभावाने उपस्थितांना हसायला भाग पडतात. अजित पवारांच्या अशाच एका मिश्किल विधानाची सध्या चर्चा सुरु आहे. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
नेमकं काय घडलं?
बारामतीत आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार यावेळी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर येताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजित दादा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. अजित पवार यांनी त्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र, त्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्यानंतर अजित पवारांनी हा वादा लोकसभेला कुठं गेला होता, अशी मिश्किल टीप्पणी केली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
“आजकाल राजकीय नेते काहीही बोलतात”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “मी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात काही योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विरोधक हा चुनावी जुमला असल्याचे म्हणत आहेत. मुळात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण राज्यातील काही राजकीय नेते आजकाल काहीही बोलत आहेत. त्यांची विधानं आपण टीव्हीच्या माध्यमातून बघतो आहे. राजकारण्यांना ढेकणं वगैरे म्हटलं जात आहे. ही नावं बघून मलाच आश्चर्य वाटतं. मात्र, मी ठरवलं आहे. आपण आपली महाराष्ट्राची राजकीय संकृती जपायला हवी. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला जी शिकवण दिली, त्यांच्या विचारांवरच आम्ही काम करतो आहे.”