बारामती : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, यंदा सरकारवर आर्थिक भार पडला असल्याने कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूननंतर होणार आहे,’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि बारामतीतील माळेगाव सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘राज्यात पहिल्यांदाच सलग सहा महिने पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अंमलबजावणी ३० जूननंतर होणार आहे. यंदा सरकारवर आर्थिक भार पडला आहे.
‘जाहीरनाम्यात शब्द दिल्याप्रमाणे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, नेहमी असा निर्णय घेतला जाणार नाही. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आर्थिक शिस्त लावली पाहिजे,’ असेही पवार म्हणाले.
‘एक देश-एक निवडणूक’ला समर्थन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश- एक निवडणूक’ या सूचनेचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘एक देश-एक निवडणूक’ यामुळे राजकारणात शिस्त येईल. मात्र, हा बदल लगेच नको.’
‘छत्रपती’ कारखान्याशी भावनिक नाते
‘भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. त्यामुळे या कारखान्याशी भावनिक नाते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारखान्याला १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कारखान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ’
‘शेतकऱ्यांविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील’
‘कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील, असे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
‘शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी आंदोलन केले. काही शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस योग्य निर्णय घेतील. शासनाने कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली असून, समितीच्या अहवालानुसार कर्जमाफी दिली जाईल,’ असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
