पुणे : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय राज्य पातळीवरील नेते घेणार आहेत. मात्र, निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवायची, याचे सर्वाधिकार पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीला दिले जाणार आहेत,’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण करूनच उमेदवार निश्चित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत वर्धापनदिनाचे नियोजन करण्यात आले. बैठकीला आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘निवडणुकीला कसे सामोरे जायचे याचा निर्णय राज्य पातळीवर होणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवायचा निर्णय झाला तरी, त्याबाबतचे पक्षाचे सर्वाधिकार त्या-त्या जिल्ह्यांच्या आणि शहरांच्या स्थानिक कार्यकारिणीला दिले जाणार आहेत. १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेसबरोबर आघाडी होती. तेव्हा स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हा आणि शहरांना देण्यात आले होते.’
‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक प्रवेश होणार आहेत. मात्र, त्यावरून कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण करू नये. पक्षाला मोठे करण्यासाठी पक्ष प्रवेश आवश्यक आहेत. कोणी कोणाला थांबवू शकत नाही. निवडून येण्याची क्षमता हाच निवडणुकीतील उमेदवारीचा निकष असणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. ही पद्धत अवलंबून शिरूरचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर यांना संधी देण्यात आली. आगामी निवडणुकांमध्येही याच पद्धतीने सर्वेक्षण केले जाणार आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस काही अपवाद वगळता कायमच सत्तेमध्ये राहिली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र, यातील तिन्ही पक्षांच्या विचारधारा भिन्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा शाहू-फुले-आंबेडकर यांना मानणारी आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. राज्यासह जिल्ह्यातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी महापालिका, नगपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील ताकद महत्त्वाची ठरते. त्यामुळे या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.’
कार्यकर्त्यांना सूचना
‘कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ताकद वर्धापनदिनावेळी दिसली पाहिजे. बालेवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोण किती कार्यकर्ते आणतो आणि ताकद दाखवितो, यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातून महापालिका निवडणुकीचा विचार होणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने कामाला लागताना बेरजेचे राजकारण करा. प्रत्येक वाॅर्डात कार्यकर्ता दिसला पाहिजे. जनसंपर्क कायम ठेवताना चुकीच्या विधानांमुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या,’ अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केल्या.