गुंड बाबा बोडके याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. देवेंद्र फडणवीस बाबा बोडकेला ओळखतच नव्हते, हा भाजपच्या नेत्यांचा युक्तिवाद त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेलेल्या पाहुण्यांची सर्व नोंद होत असते. कोण कोण भेटायला येणार आहे. त्यांची नावे काय आहेत, हे सगळे आधीच सांगावे लागते. मग असे असताना मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हते, असे म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुण्यातील वानवडी भागात पुणे महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमानंतर निवडक पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, मी सुद्धा राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. ‘वर्षा’वर कोणालाही मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचे असेल, तर आधी वेळ घ्यावी लागते. कोणत्या गाडीतून आपण येत आहोत, त्याचा क्रमांकही द्यावा लागतो. तिथे पोहोचल्यावर आत जाण्याअगोदर दोनदा तुमच्या गाडीची तपासणी होते. एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्यावरच तुम्ही चार पायऱ्या चढून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील दालनापर्यंत पोहोचता. आता बाबा बोडके कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हते असे म्हणणे कितपत योग्य आहे. हावरेंसोबत ते तिथे गेले असले, तर त्यांच्यासोबत आलेली व्यक्ती कोण आहे, हे त्यांच्या लक्षात यायला नको का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गुंड बाबा बोडकेचा फोटो थेट मुख्यमंत्र्यांसोबत झळकल्याने सत्ताधारी भाजप अडचणीत सापडला होता. सोशल मीडियावर या विषयावरून भाजपवर अनेकांनी टीका केली होती. गुंड बाबा बोडके याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओळखत नाहीत. बोडकेप्रकरण म्हणजे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आहे, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले होते. याच विषयावरून अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.