पिंपरी : अनधिकृतपणे फलक उभारुन शहर बकाल, विद्रुप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्यांना मतदान करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे छायाचित्र असलेले अनधिकृत फलक असले, तर ते काढून, अनधिकृत फलक उभारणाऱ्यांसह होर्डिंग मालकांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ ची पूर्वतयारी उपक्रमाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते शनिवारी झाला. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यावेळी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘फलक लावणारे काम करत नसतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ज्याचे फलक जास्त, त्याला मतदान करु नका.’
‘पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. वाढत्या शहराबरोबरच कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. दिवसाला १४०० टन कचरा संकलित होत आहे. जैववैद्यकीय कचरा, इलेक्ट्रीक कचऱ्याचीही व्यवस्थित विल्हेवाट लावावी. पिंपरी-चिंचवडचा देशात सातवा क्रमांक आला. पण, शहर खरेच स्वच्छ असते का?’ असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केला.
‘शहरे नियमित स्वच्छ झाली पाहिजेत. नागरिकांनीही रस्त्यावर कचरा टाकू नये. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर लोक आता लोणावळ्यात राहण्यास पसंती देतात.’ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
‘नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जलसंपदा विभागाशी चर्चा करुन त्यातून मार्ग काढला जाईल. शहराच्या विकासासाठी मदत लागेल ती केली जाईल.’ असे आश्वासन पवार यांनी दिले.
‘प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी घातक’
प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पिणे घातक आहे. बाटलीत प्लास्टिकचे कण उतरतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे प्लास्टिक अतिशय घातक आहे. प्लास्टिक पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आयुक्तांबाबत खासदार-आमदारांची वेगवेगळी मते
आयुक्त शेखर सिंह हे हट्टी आहेत. पण, कामे करतात असे खासदार बारणे म्हणाले. त्याचा धागा पकडून पवार म्हणाले, आयुक्त काम करत असल्याचे बारणे म्हणतात. पण, ते खरे आहे का हे बनसोडे यांना विचारावे. आयुक्तांबाबत खासदार आणि शहरातील पाचही आमदारांचे वेगवेगळे मत असल्याचे पवार म्हणाले.