लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहराचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ते शिवबंधन बांधणार आहेत. ठाकरे गटाकडून वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. वाघेरे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.

महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. त्यामुळे मागील दोन टर्म लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता.

आणखी वाचा-पुणे-मुंबई रेल्वेला तासाभराचा लेटमार्क! ओव्हरहेड वायर बिघाडामुळे उशीर अन् प्रवासी वाऱ्यावर

बुधवारी वाघेरे यांना निरोप आला असून पक्ष प्रवेशासाठी शनिवारी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे वाघेरे यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केले असल्याचे बोलले जात आहे. वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे शहराचे महापौर होते. वाघेरे घराणे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होते. संजोग वाघेरे यांनी महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद भूषविले होते. पक्षातील फुटीनंतर ते अजित पवार यांच्या गटात होते. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याबाबत नाराजी नाही. उमेदवारीची चर्चा झाली आहे. दोन दिवसात कळवितो असे सांगितले होते. शनिवारी प्रवेशासाठी बोलविले आहे. राजकारणात खूप पाठीमागे राहिलो. पुढे जाण्यासाठी निर्णय घेतला. -संजोग वाघेरे, माजी महापौर