लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गांजा सापडण्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता मुलींच्या वसतिगृहातील खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळून आली आहेत. या संदर्भात एका विद्यार्थिनीने विद्यार्थिनींची नावासहित तक्रार करून वसतिगृह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले.

विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका खोलीत चार विद्यार्थिनी राहत होत्या. त्यातील तीन विद्यार्थिनी मद्यपान करत असल्याची, सिगारेटी ओढत असल्याची आणि शिवीगाळ करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने वसतिगृह प्रशासन, कुलसचिवांकडेही केली होती.

वसतिगृह प्रशासनाने केलेल्या तपासणीत संबंधित खोलीस मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळून आली. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने आता कुलगुरूंकडेही पत्राद्वारे तक्रार केली आहे. या पत्रात तिने वसतिगृह प्रशासनाच्या कारभाराबाबत आरोप केले आहेत. तसेच खोलीत राहणाऱ्या विद्यार्थिनींकडून धमकी दिली जात असल्याचे, त्रासामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

या संदर्भात संबंधित विद्यार्थिनींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिसभेत चर्चा होणार का?

विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे अधिसभेत या प्रकरणाचे पडसाद उमटतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.