उसाचा गळीत हंगाम सुरू
पुणे : उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून केल्या जाणाऱ्या नियमभंगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी बेशिस्त ऊसवाहतूकदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ट्रक, बैलगाडी, ट्रॅक्टर या वाहनांकडून साखर कारखान्यांत ऊस पोहोचविला जातो. महामार्गावर ऊसवाहतूक करणारी वाहने बंद पडतात. रात्रीच्या अंधारात बंद पडलेले वाहन पाठीमागून येणाऱ्या वाहनांना न दिसल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडल्याच्या घटना घडतात. अशा अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश ऊसवाहतूकदारांच्या वाहनांच्या पाठीमागे परावर्तक पट्टी (रिफ्लेक्टर) लावली जात नाही. त्यामुळे रस्त्यात बंद पडलेले ऊसवाहतूक करणारे वाहन पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही.
साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रेलर तसेच अन्य वाहनचालकांनी वाहन परवान्याची प्रत बाळगावी. ट्रॅक्टरला फक्त एक ट्रेलर जोडण्यात यावा. एकापेक्षा दोन ट्रेलरची जोडणी ट्रॅक्टरचालकाने करु नये. ट्रेलरसहित ट्रॅक्टरची लांबी १८ मीटरपेक्षा जास्त नसावी. ट्रॅक्टरचालकाने त्याच्याबरोबर सहायक नेमावा. वाहनांच्या मागे मोठय़ा आकाराच्या परावर्तक पट्टया बसवाव्यात. ट्रॅक्टरचालकाने सेवा रस्त्याच्या वापर करावा अशा काही सूचना महामार्ग पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
महामार्ग पोलिसांच्या सूचना
* ट्रॅक्टरचालकाने वाहतुकीसाठी फक्त एका ट्रेलरचा वापर करावा.
* वाहनांच्या मागे परावर्तक पट्टय़ा बसवाव्यात.
* ताशी दहा किमी वेगाने वाहन चालवावे.
* सेवा रस्त्याचा वापर करावा.
ट्रॅक्टर, ट्रेलरवरुन करण्यात येणााऱ्या ऊसवाहतुकीस परवाना असणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकडून ऊसवाहतूकदारांनी परवानगी मिळवावी. क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केल्यास तसेच वाहतूक नियमांचे भंग केल्यास कारवाई करण्यात येईल.
– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे विभाग