पुणे : अनेक प्रकारची विद्युत उपकरणे, वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीला पर्याय ठरणारी स्वदेशी बनावटीची पहिली ‘सोडियम आयन बॅटरी’ पुण्यात विकसित करण्यात आली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेशी (एनसीएल) संलग्न ‘रिचार्जियन एनर्जी’ या नवउद्यमीच्या माध्यमातून डॉ. मंजूषा शेळके, डॉ. विलास शेळके यांनी सोडियम आयन बॅटरीची निर्मिती केली असून, विविध निकषांवर चाचण्या करून या बॅटरीला ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केले आहे.

गेल्या काही वर्षांत जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून वेगवेगळ्या प्रकारे पर्यायी इंधन, साधने विकसित करण्यात येत आहेत. त्यात बॅटरी संशोधनासह हायड्रोजन ऊर्जा, सौरऊर्जा अशा क्षेत्रात संशोधन करण्यात येत आहे. जीवाश्म इंधन आणि जैवइंधन एकत्रितपणे वापरता येणारी वाहनेही आता बाजारात आली आहेत. तसेच लिथियम आयन बॅटरीलाही पर्याय शोधण्यात येत आहेत. या अनुषंगाने पुण्यातील एनसीएलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मंजूषा शेळके यांनी सोडियम आयन बॅटरीसाठीचे संशोधन केले. त्यानंतर पती डॉ. विलास यांच्यासह ‘रिचार्जियन एनर्जी’ या नवउद्यमीची स्थापना करून आता बॅटरी उत्पादनाच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले आहे.

बॅटरीबाबत डॉ. शेळके म्हणाले, ‘आयईसी ६२६६० मानकांनुसार सोडियम आयन बॅटरी विकसित करणारी रिचार्जियन एनर्जी ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. रिचार्जियन एनर्जीने गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. ही बॅटरी १०२ अंश सेल्सियस तापमानावरही काम करते. त्यामुळे तिची सुरक्षितता अधिक चांगली आहे. २०२४ मध्ये भारतात पहिल्यांदाच सोडियम-आयन सेल्ससाठीचा प्रायोगिक तत्त्वावरील कारखाना उभारण्यात आला. या बॅटरीसाठीचे तंत्रज्ञान देशात उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित आहे. त्यामुळे ही बॅटरी संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.

आता टप्प्याटप्प्याने दररोज ५०० सेल्सचे उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्या कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. बॅटरी बाजारात आणण्यापूर्वी लिथियम-आयनच्या तुलनेत किंमत, कार्यक्षमता, देशांतर्गत सक्षम पुरवठा साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या बॅटरी विकसनासाठी अवजड उद्योग मंत्रालय, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, युनायटेड स्टेट्स इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी एंडोमेंट फंड, सोशल अल्फा यांनी सहकार्य केले आहे, असे डॉ. शेळके यांनी सांगितले.

सोडियम आयन बॅटरीची वैशिष्ट्ये काय?

सोडियम आयन बॅटरीसाठी १० एएच क्षमतेचे सेल्स वापरण्यात येत आहेत. हे सेल्स तब्बल १० हजार वेळा चार्जिंग होऊ शकतात. हे सेल्स २५ वर्षांपेक्षा अधिक काळ टिकतात. त्यामुळे या सेल्सचे आयुर्मान ई वाहनांच्या सरासरी आयुर्मानापेक्षा जास्त आहे. या बॅटरीचा वापर वाहनांसह मोठे औद्योगिक प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, तसेच विविध उपकरणांसाठी करणे शक्य आहे. या बॅटरीची किंमत लिथियम आयन बॅटरीपेक्षा नक्कीच किफायतशीर असेल, असेही डॉ. शेळके यांनी स्पष्ट केले.