पूर्वाश्रमीचे पत्रकार, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी, भाजपच्या मागासवर्गीय विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशी ओळख असलेल्या अमर साबळे यांची चर्चेत नसतानाही राज्यसभेसाठी ‘लॉटरी’ लागल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुंडे यांच्या निधनानंतर राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेल्या साबळे यांचे भाजपने खासदारकी देऊन पुनर्वसन केले आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘मराठा कार्ड’ वापरल्यानंतर राज्यसभेसाठी मागासवर्गीय चेहरा दिल्याचा युक्तिवाद पक्षातर्फे करण्यात येत आहे. राजकीय डावपेचात कमी पडल्याने पिंपरी विधानसभेची आमदारकी हुकलेल्या साबळे यांना न मागता राज्यसभेची खासदारकी मिळाली.
मूळ बारामतीचे असलेले अमर साबळे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. मुंडे यांना गुरूस्थानी मानणाऱ्या साबळे यांनी मुंडे यांच्यासाठीच पत्रकारिता सोडून राजकारणात उडी घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेल्या साबळेंनी यापूर्वी भाजपच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती. विश्वासू असल्याने गोपीनाथ मुंडे यांनी स्वत:च्या विधानसभा व नंतर लोकसभा मतदारसंघातील प्रचारयंत्रणा त्यांच्याकडे दिली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी साबळे पिंपरीत राहण्यासाठी आले. पिंपरी विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव झाला होता. त्यामुळे आमदारकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून मुंडेंनी त्यांना पिंपरीत आणले. स्थानिक पातळीवर तीव्र विरोध असतानाही मुंडेंनी त्यांना पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्याकडून ते पराभूत झाले. मात्र, त्यांना मिळालेल्या ५१ हजार मतांची नोंद पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. साबळे पिंपरीतच स्थायिक झाले. २०१४ च्या विधानसभेसाठी पिंपरीकरिता भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पाच वर्षे त्यांनी जोरदार तयारी केली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर मुंडे यांचे निधन झाल्याने साबळे यांचा राजकारणातील भक्कम आधार गेला आणि त्यांची सर्व गणिते कोलमडली. त्यानंतरच्या पक्षांतर्गत घडामोडीत साबळेंचा पत्ता कापण्यात आला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील तत्कालीन दावेदार पंकजा मुंडे यांच्याच पाठीशी साबळे राहतील, या शक्यतेने भाजप नेत्यांनी रिपाइंसाठी पिंपरीची जागा सोडून त्यांचा राजकीय ‘गेम’ केल्याचे बोलले जाते. वर्चस्वाच्या वादातून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आमदारकीची संधी हुकल्याने साबळे नाराज होते. निवडणुकीत रिपाइंचा पराभव झाला आणि शिवसेनेचा आमदार निवडून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपरीत भव्य सभा होऊनही भाजप-रिपाइं युतीचा उमेदवार पडला. सत्तास्थापनेसाठी एकेक आमदार कमी पडू लागला, तेव्हा पिंपरीतील हक्काची जागा चुकीच्या निर्णयामुळे गेल्याची भावना भाजप नेत्यांनी व्यक्त केली. साबळे यांच्यावर झालेला अन्याय दूर करा, त्यांचे पुनर्वसन करा, अशी आग्रही मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती. पंकजा मुंडे यांनीही प्रतिष्ठेचा मुद्दा केला. प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांची निवड झाली, तेव्हा साबळेंच्या नावाची चाचपणी झाली होती. मात्र, ‘मराठा कार्ड’ वापरण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला. त्यानंतर, एखादे महामंडळ मिळावे, यासाठी साबळेंचा प्रयत्न होता. मात्र, कोणतीही चर्चा नसताना ऐनवेळी राज्यसभेसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुध्दे, दिल्लीतील कार्यालयमंत्री श्याम जाजू, राज्यातील कोषाध्यक्षा शायना एन.सी अशी वजनदार नावे चर्चेत असताना नाटय़मय घडामोडीनंतर मागासवर्गीय चेहरा म्हणून साबळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर साबळे यांना उमेदवारीची कल्पना दिली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.



