पुणे : साईनगर, कात्रज परिसरात बेकायदा बांधलेल्या एका घरातील गावठी दारू अड्ड्यावर आंबेगाव पोलिसांनी कारवाई केली. महापालिकेच्या मदतीने या अड्ड्यावर बुलडोझर चालविण्यात आला. बेकायदा बांधलेले घर आणि पत्र्याचे शेड पाडून टाकण्यात आले.

कात्रज भागातील सच्चाई माता मंदिर परिसरापासून काही अंतरावर साईनगर आहे. या भागातील काही महिला बेकायदा दारू अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेथे बेकायदा घर आणि पत्राशेड बांधण्यात आले होते. यापूर्वी पोलिसांनी तेथे कारवाई केली होती. याबाबतची माहिती महापालिकेला कळविण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदा घर, तसेच शेड बुलडोझरचा वापर करून पाडले. पोलिसांनी तेथून दारूचे प्लॅस्टिक कॅन जप्त केले, अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.