पुणे : पावसाळ्यातील हवेत आर्द्रता जास्त असल्याने जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण होते. यामुळे शहरात डोळ्यांच्या संसर्गात वाढ दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ अधिक प्रमाणात दिसत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गातील वाढीबाबत रूबी हॉल क्लिनिकमधील नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संतोष भिडे म्हणाले, ‘पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेची पातळी जास्त वाढते. यामुळे जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे या काळात डोळ्याची साथ येते. याचबरोबर हवा प्रदूषणात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे डोळ्यांच्या संसर्गात वाढ होत आहे. अनेक वेळा डोळ्यांना संसर्ग झाल्यानंतर परस्पर दुकानांतून औषधे घेऊन त्यांचा वापर नागरिक करतात. यामुळे संसर्ग आणखी बळावू शकतो. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. डोळ्यांना आधी इजा झालेली असल्यास संसर्ग झाल्यानंतर नेत्रपटलाचा अल्सर होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग झाल्यास नेत्रतज्ज्ञांना दाखविणे गरजेचे आहे.’
याबाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रणव पाटील म्हणाले, ‘पावसाळ्याच्या आगमनासोबत डोळ्यांचे संसर्गसुद्धा वाढतात. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता, डबक्यांतील साचलेले पाणी व स्वच्छतेचा अभाव यामुळे जंतूंचा प्रसार वाढतो. यामुळे विषाणूजन्य कंजक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे, ॲलर्जिक रिॲक्शन, स्टाय म्हणजे डोळ्याजवळ फोड येणे यासारख्या समस्या अधिक दिसून येतात.
डोळे लाल होणे, पाणी येणे, खाज सुटणे, सूज येणे हे लक्षणे आढळल्यास तत्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात लावणे टाळणे, टॉवेल, रूमाल यांसारख्या वस्तूंची देवाणघेवाण न करणे, स्क्रीन टाइम कमी ठेवणे व स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग झाल्यास स्वःच्छता राखून योग्य औषधोपचार करणे महत्त्वाचे आहे.’
लक्षणे कोणती?
- डोळे लाल होणे.
- डोळ्यांना खाज सुटणे.
- डोळे सुजणे.
- डोळ्यांतून पाणी येणे.
काळजी काय घ्यावी?
- हात नेहमी स्वच्छ धुवावेत.
- अस्वच्छ हाताने डोळ्यांना स्पर्श करू नये.
- डोळे आल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
- डोळे आल्यास गॉगलचा वापर करावा.
- दुसऱ्या व्यक्तीच्या रुमालाचा वापर करू नये.
- स्वत:हून कोणतीही औषधे घेऊन वापरू नयेत.